कौन बनेगा पद्मश्री!

पद्म पुरस्कार आणि वादंग यांचं नातं तस जुनचं आहे. महाराष्ट्रापुरत बोलायच झाल तरी ना.सि. फडकेंना १९६० मध्ये मिळालेल पद्मभुषण त्यांच्या साहित्य गुणांमुळे की यशवंतराव चव्हाणांशी असलेल्या सलगीमुळे, असा वाद उभा राहिला होताच. पण गेल्या काही दिवसात या पुरस्कारांच्या वाटपातल नाट्य हे एखाद्या गल्लाभरु चॅनेलवरच्या रिऍलिटी शो किंवा ‘कौटुंबीक’ मालिकेच्या वळणाने जाताना दिसत आहे. बाप-मुलातले मतभेद, आरोप-प्रत्यारोप, तू तू मै मै, कुरघोडी, मालिकेच्या शेवटच्या भागात एखाद नविनच पात्र उभ रहाण वगैरे सुरस आणि चमत्कारिक गोष्टींमुळे या ‘खेळाला’ कौन बनेगा पद्मश्री सारखं नाव देवून, पुरस्कर्ते शोधून, sms मागवूनही पुरस्कार दिले तर कदाचित आत्तापेक्षा कमी वाद-वादळ उठतील की काय असा प्रश्न पडतो.

ब्रिटीश सत्तेच्या काळात असे पुरस्कार सरळ सरळ ‘राजनिष्ठे’शी जोडलेले होते, आणि स्वाभाविकच असे पुरस्कार मिळालेल्यांबद्द्ल भारतीयांच्या मनात घृणेची, तिरस्काराची भावना होती. १९५४ मध्ये जेव्हा पद्मश्री, पद्मभुषण पद्मविभुषण आणि भारतरत्न हे पुरस्कार सुरु झाले, तेव्हा निष्कलंक चारित्र्याच्या आणि कला, विज्ञान, क्रिडा क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या व्यक्तींनाच हे पुरस्कार मिळतील, असा आशावाद व्यक्त होत होता. पण एका पाठोपाठ एका सरकारांनी राजकीय सोय, नेत्यांची मर्जी किंवा ठरविक समाजगटांना चुचकारण्याची संधी म्हणून या पुरस्कारांकडे पाहुन त्यांची किंमत कमी कमी केली आहे. एम जी रामचन्द्रननी मानपत्र हिंदीत असल्यामुळे पुरस्कार नाकारला किंवा खुशवंत सिंगनी १९८४च्या शिख विरोधी दंगलींच्या निषेधार्थ पुरस्कार परत केला, तेव्हाही या पुरस्कारांमध्ये राजकारण आणल्याची चर्चा झालीच होती. पण गेल्या काही वर्षांमधल्या इतक्या नावांवर वादंग उठलेत, की काही दिवसांनी असे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींबद्द्ल सामान्य माणसांना आदर वाटण्या ऐवजी “यांचे वरपर्यंत लागेबांधे आहेत वाटत” अस (आणि इतकच) वाटेल, अशी भिती वाटते.

२००८च्या याद्या जेव्हा जाहीर झाल्या, तेव्हा त्यापैकी एक नाव होतं जम्मू कश्मिर राज्यातल्या हशमत उल्ला खान यांच. त्यांना कला क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल पद्मश्री जाहिर झाल होत. पण जेव्हा पत्रकारांनी जम्मू कश्मिर सरकारकडे यांची चौकशी केली, तेव्हा राज्याच्या मुख्य सचीवांनी चक्क कानावर हात ठेवले. हे कोण आहेत, ते कुठे रहातात, त्यांची नक्की कामगिरी काय, हे काही आपल्याला माहित नाही, आणि आमच्या सरकारनी सुचवलेल्या यादीतही हे नाव नाही, अस सांगुन टाकल. राज्य सरकारच्या सांस्कृतीक विभागातल्या अधिकार्‍यांना एकच हशमत उल्ला खान माहिती होते –  पण ते कृषी विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरु आहेत, आणि कला क्षेत्राशी त्यांचा संबंध नाही अस त्यांनी स्वत: स्पष्ट केल.

थोड्याच काळात गृह मंत्रालयानी हे स्पष्ट केल की हे हशमत उल्ला खान जरी कश्मीरी असले तरी सध्या ते दिल्लीत रहातात, आणि कश्मीरी शालींच दुकान चांदनी चौक भागात चालवतात. त्यांना स्वत:लाही हा पुरस्कार मिळाल्याच आश्चर्य वाटल, कारण त्यांच नाव कोणी सुचवल असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. राष्ट्र्पतींच्या सचिवालयानी पद्म पुरस्कारंची यादी गृह मंत्रालयाकडून ‘अंतीम’ स्वरुपातच आमच्याकडे येते, अस म्हणून जबाबदारी झटकली. गृहमंत्र्यांनी तर पत्रकारांनाच सल्ला दिला की त्यांनी हशमत उल्ला खानांना मिळालेल मानपत्र वाचल म्हणजे त्यांच कला क्षेत्राला नक्की योगदान काय हे कळेल. या सगळ्या गदारोळात हे नाव सुचवल कोणी आणि का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला!

याच यादीमध्ये ऑलिंपीक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिन्द्राला पद्मभुषण मिळाल, पण कांस्य पदक विजेते सुशिल कुमार आणि विजेन्द्रसिंह यांची नाव मात्र कुठेच नव्हती. माहिती अधिकार कायद्याखालच्या एका प्रश्नाला उत्तर देताना गृह मंत्रालयानी कबूल केल, की निवड समितीपुढे जी १०९३ नाव ठेवली गेली त्यात या दोघांचीही नाव होती, पण अंतीम १३३ नावांमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही.

२००९च्या याद्यांबद्दल सध्या भरपुर वाद चालूच आहेत. संतसिंग चटवाल नावाच्या, सिबीआयचे पकड वॉरंट चुकवून पळून गेल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला चक्क पद्मभुषण मिळाल. यांनी बॅंक ऑफ बडोदा आणि बॅंक ऑफ इंडियाला ९० लाख डॉलरना फसवण्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपानंतर भारत सोडला, अमेरिकेत हॉटेल व्यवसाय चालू केला, आणि आता म्हणे हिलरी क्लिंटनशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. भारत आमेरिका अणूकरारासाठी त्यांच्या कथीत प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याच सरकार सांगत. भाजपाने या संदर्भात टिकेची झोड उठवल्यावर कॉंग्रेस प्रवक्त्याने मात्र “हा अहवाल निष्कलंक व्यक्तीलाच मिळाला पाहिजे” असे आपल्या पक्षाचे मत असल्याचे सांगत पंतप्रधानांना एकाकी पाडले. शेवटी गृह मंत्रालयानी संतसिंगांवर ‘सध्या’ कुठलाच खटला चालू नसल्याच सांगुन सारवासारव केली. पण खाजगीत मात्र हे अधिकारी पुरस्कारांच्या मुळ यादीत हे नाव नव्हतंच अस कबूल करतात. आणि खटला चालवायला पुरेसे पुरावे आपल्याकडे आहेत, अस मत तपास अधिकार्‍यांनी व वकिलांनी लेखी व्यक्त करुनही CBI च्या प्रमुखांनी संतसिंगांवरचे खटले न चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळेच ‘सध्या’ कुठलाच खटला चालू नाही, हे ही उजेडात आलं आहेच.

२००१ साली अटलबिहारी वाजपेयींवर उपचार करणार्‍या डॉ. राणावतांना पद्मश्री मिळाले, तसच यंदा मनमोहनसिंगांनीही डॉ. रमाकांत पंडांचे ‘हृदयापासून’ आभार मानले. नशीब सध्याचे पंतप्रधान कविता करत नाहीत, नाहीतर ते गाणारा एखादा गायकही तेवढ्यामुळे पुरस्काराचा धनी झाला असता!

यंदा भारताच्या शिरपेचात तुर खोवणार्‍या चांद्रमोहिमेच नेतृत्व करणार्‍यांपैकी कोणाचच नाव या याद्यांमध्ये नव्हत, पण इस्त्रोचे डॉ. माधवन नायर आणि अनिल काकोडकरंना मात्र पुरस्कार मिळाले. त्यामुळे हे पुरस्कार तरी अणूशास्त्रातल्या कामगिरी बद्दल की अमेरिकेबरोबरच्या अणूकराराला ‘शास्त्राधार’ पुरवल्याबद्दल, अशी शंका येते.

काळविटांची बेकायदा शिकार केल्याच्या खटला प्रबंधीत असलेला सैफ़ अलि खान सारख्यांना पद्म पुरस्करांमध्ये स्थान मिळू नये, म्हणूनच संपूर्ण यादी गृह विभागातर्फे तपासली जाते. पण यादी अंतिम स्वरुपात तयार झाल्यावरही पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री वगैरे कार्यालयांकडून नावे वाढवली जातात, तेव्हा असे काही पद्मपुरस्कार प्राप्त महानुभाव नंतर तुरुंगात शिक्षा भोगताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको!

या यादीकडे वरवर जरी नजर टाकली तरी कॉंग्रेस किंवा मित्र पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमधल्या नावांच प्रमाण किती जास्त आहे, हे लक्षात येतं! त्यामुळे तुम्हाला जर असा काही पुरस्कार हवा असेल, तर केन्द्रात आणि तुमच्या राज्यात एकाच पक्षाच सरकार असेल, आणि त्यात योग्य जागी तुमच्या कर्तृत्वाबद्दल आदर असणारी माणस असतील याची काळजी तुम्हाला घ्यावीच लागणार!

‘भारत रत्न’पुरस्काराचे स्थान या सर्व पुरस्कारंच्या वर. अगदी अपवादात्मक कर्तृत्वासाठीच द्यायचे असल्यामुळे दर वर्षी हे दिले जातातच, असही नाही. त्यामुळे निदान त्या बाबतीत तरी सत्तधार्‍यांनी संयम पाळावा, आणि हे पुरस्कार वादातीत ठेवावेत ही अपेक्षा काही फार जास्त म्हणता येणार नाही. पण अण्णा द्रमूकच्या एम जी रामचंद्रन किंवा कॉंग्रेसचे अध्यक्ष कामराज, मदर टेरेसा, माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, अगदी राजीव गांधींना मिळालेल भारत रत्न हे अपवादात्मक कामगिरीबद्दल मिळाल, अस म्हणण जरा धाडसाच होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा जयप्रकाश नारायणांच्या उत्तुंग कर्तृत्वाबद्दल जरी सामान्य भारतीयांना शंका नसली, तरी आंबेडकरंना भारतरत्न मिळाल ते व्ही पी सिंगांच्या मंडल आंदोलन काळात १९९० साली आणि जयप्रकाशांना सर्व कॉंग्रेसविरोधक वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एकत्र आले तेव्हा १९९९ साली! त्यामुळे भारतरत्न देतानाही राजकीय सोय पाहिली जाते, यात काही शंका नाही.

या यादीत कुठेच महात्मा गांधींच नाव नाही. अर्थात ते अश्या कुठल्याही पुरस्काराच्या पलिकडे आहेत, यात काही शंका नाही. सुभाषचंद्र बोसांना १९९२मध्ये हा पुरस्कार दिला जाणार होता खरा. पण यामध्ये ‘मरणोत्तर’ असा शब्द वापरल्याने काही लोकांनी आक्षेप नोंदवून सुभाषबाबूंच्या मृत्यूचा पुरावा देण्याची मागणी केली. त्यामुळे वादंग टाळण्यासाठी सरकारनी हा पुरस्कार द्यायचच रद्द केलं!

अश्या सगळ्या ‘एकमेका सहाय्य करु’ वातावरणात वेगळेपणानी उठून दिसत ते मौलाना अबुल कलाम आझादांच वागणं. त्यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव त्यांनी ‘या निर्णयप्रक्रीयेत सहभागी असणार्‍यांनी हे पुरस्कार घेणं योग्य होणार नाही’ अस सांगून नाकारला. त्यांना भारतरत्न मिळाल, ते मरणोत्तर १९९२ मध्ये.

आपल्या देशात खर म्हणजे रत्नांची वाण नाही. पण पद्म पुरस्कारंसाठी नाव सुचवण, ती निवड समिती समोर ठेवण, या निवड समितीच्या बैठका होण, आंतिम यादी पंतप्रधान कार्यालयाच्या मंजूरीनंतर राष्ट्रपतींकडे जाण, आणि ती जाहीर होण या सगळ्या प्रक्रीयेमध्ये कमीत कमी पारदर्शकता ठेवून आपण एक अनावश्यक गुढ निर्माण केल आहे. माहिती अधिकार कायद्याच्या उपयोगाने हा पडदा थोडा किलकिला झाला तर काय दिसत, त्याबद्दल पुन्हा केव्हातरी!

Advertisements

8 thoughts on “कौन बनेगा पद्मश्री!

 1. dilip belgaonkar March 13, 2010 / 6:29 pm

  lok jagruticha tuza praytana stutyach aahe, lokanchya drustine ‘mala kay tyache’asha vishyanvar tu lokana bolate kelas. ahse puraskar denya mage aanek viparit hetu wa shadyantra asate tyacha pardafash karnyachi garaj aahe, shakya aasel tar tya sathi RTI kinva kayadyachi madat gheta yeil ka? Dhanyavad!

 2. Suhas Vaidya March 12, 2010 / 5:38 pm

  Following your write up for quite some time! You have it in you! Off course I agree with all your thoughts.

  As a result of the incidences you highlighted, these awrds have lost the “credibility” it used to enjoy . A person working for true cause never expects something in return.

  Tilak became “Lokmanya” and Gandhiji became “Mahatma” by the people of the country!Thank god we were not independent that time otherwise these thier credibility would have been at stake! – Suhas

 3. ravi bhangonkar March 12, 2010 / 10:42 am

  Changale lihile aahe. In fact these puraskars are many times purchased…..earlier we stop this distribution favour it will be better ’cause we can’t expect any political party to behave in a rational manner…

 4. pradeep peshkar March 12, 2010 / 10:41 am

  अतुल,खूप माहिती पूर्ण आहे .असेच अनेक सामाजिक संस्था तर्फे सुद्धा पुरस्काराचे दुकान चालवले जातात त्या बद्दल लिहिणार का?

 5. Teja salgaonkar March 11, 2010 / 1:10 am

  योग्य शब्दात आणि चांगल्या तर्‍हेने विषय मांडला आहे. मुळात प्रश्न अस उरतो की या व अश्या अनेक सरकारी/ निमसरकरी प्रयोजन आणि आवश्यकता खरोखरच आहे का? तसेच अशा किती पुरस्कारंची योग्यता आपण पडताळून पाहू शकतो/ पाहणार आहोत?

  ऑस्करबद्दल आपण बघितलेच; नुसता सिनेमा चांगला असुन भागत नाही तर त्याचे पुरेसे canvassing व्हावे लागते! तसे कदाचित इतर पुरस्करांबाबतीत नसेल कशावरून?

 6. Mandar Bharde March 10, 2010 / 10:06 pm

  I like this. many times you will find that those who get use it as a weapon against government. they use it as a bargaining tool against government.
  it is equally worst. Amuk ak kele tar purskar parat karu ? amuk ak zale nahi tar purskar parat karu wagaire.

 7. दिनानाथ मनोहर March 10, 2010 / 8:11 pm

  प्रिय अतूल, तुझा रा.टू इ. वरील लेख वाचला, पण त्यावर आता काही भाष्य करत नाही. हा लेख मला आवडला, एकूण रचना आणि लावलेला सूर दाद देण्यासारखा आहे. अर्थात पुढच्या भागात काय करतोस ते वाचेनच. मला एक वाटतं की, एकूणच कोणताही पक्ष सत्तेवर नसतो तेव्हा असलेली नेत्यांची नजर पक्ष सत्तेवर गेल्यावर बदलते. परराष्ट्र धोरणात होणाऱ्या बदलांबाबत निदान असं म्हणता येईल की, सत्तेवर नसताना त्यांना माहीत नसलेल्या बऱय़ाच गोष्टी माहीत झाल्यामुळे हा बदल होत असावा.पण इतर बाबतीत होणारे बदल हे सत्ता मिळविण्यासाठी घेतलेली संघर्षाची भूमिका आणि सत्ता टिकविण्यासाठी केलेल्या समझोत्यांची भूमिका ह्यातील आंतरद्वव्दातून आकारात येत असाव्यात.लवकरच मी ही माझी साईट सुरू करत आहे. प्रथम ह्यात माझी रोबो कादंबरी मराठी आणि इंग्लीशमध्ये उवलब्ध करून देण्याचा विचार आहे. नासिकला आलो तेव्हा आपली भेट होऊ शकली नाही. भेटूया.
  दिननाथ मनोहर.

 8. jamshid March 10, 2010 / 5:43 pm

  all these awards are politicaly influenced and so always there be politics muzaffar hussain (jounalist,mumbai)got padmashri during nda govt,if someone asks whts his contribution to journalism?there is no genuine answer so these awards will alwys be sahdowed by politician and whn ever ther are politician at work we shld not xpects much ou o it,trnsparency,honesty all ths does not implies to politicans as this sounds pessimistic but its a fact.but article is good information on govt awards

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s