फेसबूक – सत्तांतराचे नवीन माध्यम?

मागच्या महिन्यात इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी सत्ता सोडली, आणि आपल्या देशातल्या स्वप्नाळू क्रांतीकारकांना आनंदाचे भरते आले. भ्रष्टाचाराला कंटाळलेली सामान्य जनता- तिचे रस्त्यावर उतरणे – जीन्स टीशर्ट घालणारे, चटपटीत, स्वच्छ दाढ्या केलेले तरुण निदर्शक, लष्कराचा लोकांना ‘आतून’ पाठींबा, त्यामुळे वरवर  तरी रक्तहीन दिसणारा सत्ता बदल –  एखाद्या चित्रपटाच्या पटकथेत शोभून दिसेल असा हा प्रकार. त्यात पुन्हा कोणी मोठा नेता किंवा चळवळ याच्या मागे नसल्यामुळे  ‘राजकारण्यांनो जागे व्हा – जनता काय करू शकते बघा’ अशी बोंब मारायची पूर्ण संधी. त्यामुळे आपल्याकडे असं काहीतरी का होत नाही, अशा चर्चांना रंग चढला.

ही संधी माध्यमांनी साधली नस्ती, तरच नवल. त्यांच्या instant तज्ञांनी या घटनेचे विश्लेषण करताना या निदर्शनांच्या संदर्भात फेसबुक आणि ट्वीटर सारख्या social networking sites ने बजावलेल्या महत्व पूर्ण कामगिरीचा पुरावा म्हणजे ही क्रांती, असा सूर लावला. इराण, ट्यूनिशिया  वगैरे अनेक देशांमधील गेल्या २-३ वर्षांमधल्या असंतोषाचे यासाठी दाखले दिले गेले. एकूण सूर असा होता, की आता फेसबुक आणि ट्वीटर सारख्या सुविधांमुळे, आणि त्यांचा उत्तम वापर करणारी तरुण पिढी परिवर्तन, लोकशाही यांची मागणी करणारी असल्यामुळे यापुढे हुकुमशाही राजवट चालवणे जास्त अवघड होणार आहे. अगदी ब्रह्मदेश, इराण, कोरिया वगैरे देशांमध्येही कदाचित अशाच प्रकारे इंटरनेटमधून लोकशाही व कायद्याचे राज्य प्रगट होईल. २७ जानेवारीच्या एका यू टयूबला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर social networking sites ची तुलना विचार/उच्चार स्वातंत्र्याशी करून त्यांचे महत्व अधोरेखीत केले आहे.

पण केवळ social networking च्या माध्यमातून सत्तांतर होवू शकते का? हे म्हणजे १९८० च्या दशकातल्या शीख दहशतवादाला जर्नैलसिंग भिन्द्रनवालेच्या भाषणांच्या casettesना जबाबदार धरण्यासारखं झालं. केवळ social networking च्या माध्यमातून एखाद्या संघटनेचा विचार समाजातल्या अनेकांपर्यंत पोचणे, त्यातले काही कार्यकर्ते बनणे, त्यांचे प्रशिक्षण अशी अनेक कामे स्वस्त, वेगात आणि सोयीस्कर होतात. पण कुठल्याही अन्य साधनाप्रमाणेच social networking च्याही अंगभूत मर्यादा आहेत. आणि याही साधनाचा खरा उपयोग हे साधन किती लोकांना वापरायला उपलब्ध आहे, आणि ते त्याचा  वापर किती समजून उमजून करतात, यावरच अवलंबून आहे.

social networkingचे फायदे:

संघटनेचे/ क्रांतीचे तत्वज्ञान मांडणे, विकसित करणे, आपल्या मनातील आदर्श कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे, नवीन व्यक्तींना संपर्क करून त्यांना आपले विचार पटवून देणे, इथपासून ते कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि कार्यक्रमांचे निरोप देणे अशा अनेक गोष्टी इमेल, ग्रुप्स, ब्लॉग, व social networking या माध्यमातून अतिशय वेगाने, तसेच अतिशय मर्यादित खर्चात करणे शक्य आहे. ज्या संघटनांकडे अजून देणग्यांचा ओघ सुरु झालेला नाही, त्यांना हे फायदे आकर्षक वाटतील, यात काही शंका नाही. शिवाय जेव्हा संघटनेचे केडर कमी संख्येचे असेल, तेव्हा आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरण्यासाठी लागणारा पैसा, वेळ आणि कष्ट यांची अश्या माध्यमातून चांगलीच बचत होवू शकते. ज्यांना सरकारी कटाक्षापासून दूर राहूनच संघटना वाढवायची आहे, त्यांना ही घरी/ ऑफिसमध्ये बसल्या बसल्या हे काम करणे अधिक सुरक्षित वाटेल, हे नक्की.

कार्यक्रम किंवा आंदोलन ठरवल्यापासून, ते जाहीर कधी करायच, आणि प्रत्यक्षात कधी आणायचं, याबद्दलही  इंटरनेट माध्यमाच्या वेगामुळे संघटनेला लक्षणीय लवचिकता मिळू शकते. एखाद्या प्रक्षोभक क्षणी चटकन देशभर एकाच स्वरुपाची प्रतिक्रिया उमटायला हवी असेल तर इंटरनेटचा फार उपयोग होवू शकतो, आपण होताना बघातोही.

पण केवळ इंटरनेटच्या माध्यमातून एखादी चळवळ, संघटना सत्तापरिवर्तन करण्याएवढी ताकदवान होवू शकते का? इजिप्तमध्ये केवळ १५% लोकसंख्येला इंटरनेट जोडणी उपलब्ध आहे. त्यांच्यापैकी किती लोक फेसबुकचे सदस्य असतील? आणि त्यांच्यापैकी किती या चळवळीशी सहानुभूती ठेवणारे असतील? त्यांच्यापैकी किती लाठ्या/ अश्रुधूर/ गोळीबार/ चेंगरा चेंगरी असे धोके पत्करून, मरण्याच्या- मारण्याच्या तयारीने १०-१५ दिवस सलग रस्त्यावर उतरतील? की यांच्यापैकी जास्त लोक ‘डर्टी पोलिटीक्स’ पासून आम्ही ४ हात दूरच राहतो, अस अभिमानाने सांगणारे असतील?

सत्ता बदलण्याएवढी एखादी चळवळ मोठी व्हायची असेल, तर त्या चळवळीमध्ये शहरी कामगार वर्ग, मध्यम वर्ग, ग्रामीण शेतकरी- शेतमजूर, सेवानिवृत्त लोक, छोटे-मोठे व्यावसायिक अशा अनेक समाज गटांचा पाठींबा मिळवणारे कार्यक्रम/ कार्यकर्ते असावे लागतात. इजिप्त मध्ये काय, किंवा आपल्याकडे काय, अशा अनेक समाज गटांवर सायबर विश्वातील घडामोडींचा काहीच परिणाम होत नाही.

या संदर्भात एक बोलके उदाहरण पाहू. इजिप्तमध्ये ‘६ एप्रिल चळवळ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाने २८ जानेवारी २०१०ला (म्हणजे सत्तांतराच्या महिनाभर आधी) कैरोतल्या अन्य देशांच्या वकिलातीसमोर निदर्शने करायचे ठरवले. याचा संपूर्ण प्रचार विशेषत: इंग्रजी बोलणाऱ्या इजिप्तमधल्या तरुण पिढीने, फेसबुक सारख्या माध्यमांतून केला. याच्या फेसबुक पेजवर ८९,२५० लोकांनी निदर्शनांमध्ये यायचे कबुल केले. निदर्शनांच्या दिवशी सकाळी सरकारने मोबाईल व इंटरनेट पूर्ण बंद केले. प्रत्यक्षात साधारण २,००० निदर्शक जमले. पोलिसांनी अगदी सहजपणे ही निदर्शने मोडून काढली.

social networking आणि सरकारी दमन यंत्रणा

ज्या कारणांनी इंटरनेटवरून सामाजिक चळवळीचा प्रचार करणे सोपे आहे, तेच नेमके फायदे आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणाही घेवू शकते. विशेषत: पोलिसांच्या गुप्त वार्ता संकलन विभागाला तर इंटरनेटवरून फारच व्यवस्थित वर्गीकरण केलेली, नेमकी माहिती मिळवता येते. त्यामुळे सायबर विश्वातील कारवायांच्या आधारे चळवळ चालवणाऱ्यांना किंवा प्रत्यक्षात सत्ता उलटू पाहणाऱ्यांना याचाही विचार करावा लागेलच.

१)    इंटरनेट सेवा बंद करणे: असंतोष पसरू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या हातात हे सर्वात सोपे आणि झटपट साधन असते. जेथे internet service provider खाजगी कंपन्या आहेत, तेथेही त्यांना band width सरकारकडूनच घ्यावी लागते, हे ज्ञान एव्हाना ‘राजा’कृपेनी आपल्याला सगळ्यांना मिळाले आहेच. त्यामुळे चीन, इराण, ब्रह्मदेश, वगैरे ठिकाणी तर हे तुलनेनी अधिकच सोयीस्कर आहे. चीनमध्ये तर म्हणे इजिप्तमधल्या उठावाच्या बातम्यासुद्धा गुगल मध्ये शोधता येवू नयेत, असे फिल्टर्स कार्यरत आहेत.

२)    संघटनेच्या ‘चाहत्यां’मध्ये खबरी पेरणे: इंटरनेट हे बिन चेहेर्‍याचे माध्यम असल्यामुळे, पोलीस यंत्रणेच्या लोकांना ‘संशयास्पद’ गटांची सदस्यता मिळवणे आणि त्यांच्या फेसबुक पोस्ट्स किंवा ट्वीटस, ब्लॉग्स वर लक्ष ठेवणे सोपे आणि कमी कष्टाचे आहे. त्या आधारे गटाचे खरे नेते कोण, या गटातील अतिरेकी विचाराकडे झुकणारे कोण, त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत, त्यांचे , कुटुंबियांचे फोटो, ही सर्व माहिती विनासायास मिळू शकते. पोलिसांच्या नेहेमीच्या मार्गाने मिळालेल्या माहितीची जोड दिल्यानंतर एखाद्या संघटनेला कल्पनाही करता येणार नाही, इतके सुस्पष्ट चित्र सुरक्षा यंत्रणा उभे करू शकतात. जरी एखाद्या गटातले म्होरके टोपण नावाने वावरत असले, तरी त्यांचा ip address व प्रत्यक्ष ठाव ठिकाण शोधणे फारच सोपे आहे.

प्रत्यक्ष फेसबुक कंपनीला सुरवातीला मोठा पतपुरवठा करणाऱ्यांमध्ये ‘IN-Q-Tel’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकेच्या CIA नी ‘अमेरिकी गुप्त हेर विभागांना अद्यायावत माहिती तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी’ सुरु केली आहे हे लक्षात घेतले, म्हणजे या माहितीच्या स्त्रोताकडे सरकारे कोणत्या दृष्टीने बघतात, हे स्पष्ट होईल. शिवाय ही माहिती CIA नी उघड होवू दिली, याचा अर्थ हे हिमनगाचे वरचे टोक असणार, यात काही शंका नाही.[1]

३)    समर्थकांची दिशाभूल करणे: एखाद्या चळवळीच्या नेत्यांविरुद्ध किंवा वेगळे मत असणारा गट हाताशी धरून, नेत्यांचे वैयक्‍तिक चारित्र्य हनन करणे, फुट पडणे, वगैरे नेहमीचे हातखंडा प्रयोग तर सरकारे करत असतीलच. पण एखाद्या आंदोलनाची खोटी बातमी (नेत्यांच्या ई मेल hack करून) नेटवर पसरवणे, किंवा एखाद्या संघटनेच्या सदस्यांना हिंसाचाराला उद्युक्त करून त्या निमित्त्याने अटक/ बंदी घालणे वगैरे प्रयोगही काही सरकारे नक्की करत असतील.

जेव्हा सरकार अशा मार्गांचा वापर करेल, तेव्हा चळवळीच्या नेतृत्वाचा खरा कस लागेल. अशा वेळी इंटरनेट वर अवलंबून न राहता, साधे फोन, पत्रके, पोस्टर्स, प्रत्यक्ष भेटी यातून संघटनेला मार्गावर ठेवणे, हे वाटते तेवढे सोपे नाही. कुठल्याही आंदोलनात प्रत्यक्ष कृतीच्या वेळेस नेत्यांचा दृढ निश्चय, विरोधकांच्या चाली ओळखून त्यांच्यावर मत करण्याचे कौशल्य, त्यांचा आणि समर्थकांचा एकमेकांवरचा विश्वास या गोष्टी निर्णायक महत्वाच्या बनतात. अशा वेळी कदाचित social networking वापरण्याचे कौशल्य निरुपयोगी बनेल. आणि इंटरनेट वर अवलंबून राहण्याची सवय घातक ठरेल.

social networking आणि माहिती युग

गेल्या काही वर्षांत माहिती, आणि माहिती तंत्रज्ञान यांनी मानवी आयुष्यात फार मोठे बदल घडवून आणले आहेत. अर्थातच सामाजिक बदल घडवू पाहणाऱ्यांना याकडे दुर्लक्ष करणं परवडणारे नाही. सत्ता मिळवण्याची/ बदलवण्याची आकांक्षा असणाऱ्यांना तर हे फारच महत्वाचे आहे. माहितीच्या स्फोटाबरोबर  आलेल्या अनेक नवीन गोष्टींचा चलाखीने उपयोग करणारे गट अगदी कमी वेळात आणि श्रमात जगभर प्रसिद्धी, पाठीराखे आणि पैसे मिळवू शकतात. कुराण जाळण्याची  पोकळ धमकी देवून, आणि TV channelsना भरमसाठ मुलाखती देवून, जगप्रसिद्ध झालेला पाद्री टेरी जोन्स आठवतो ना? अनेक अतिरेकी गट सुद्धा या माध्यमाचा वपर आपापल्या पद्धतीने करत असतातच.

या माध्यमांच्या मर्यादा लक्षात घेवून जर यांचा वापर केला, तर हे खरच उपयोगाच आहे. या माध्यमात सेन्सॉरशीप जवळ जवळ नाही. संपादकीय धोरणाची भानगड नाही. अतिशय स्वस्तही आहे, आणि वेगवानही. त्यामुळे आपले विचार मांडणे, दुसऱ्याचे समजून घेणे, अनेक व्यक्ती/ संघटना माहिती करून घेणे, त्यांच्याशी एकाच वेळी  संपर्क ठेवणे, आणि महत्वाचे म्हणजे हे सर्व काम आपल्या सोयीच्या वेळात करणे यासाठी internet आणि विशेषत: social networking वापरले पाहिजे. भलत्या अपेक्षा ठेवल्या नाहीत, म्हणजे झाले.


[1] याशिवाय, अमेरिकेच्या संरक्षण खात्यांतर्गत एक Information Awareness Office चालते. त्याचे उद्दिष्ट आहे – Applying surveillance and information technology to track and monitor terrorists and other asymmetric threats to national security, by achieving Total Information Awareness (TIA). This would be achieved by creating enormous computer databases to gather and store the personal information of everyone in the United States, including personal e-mails, social networks, credit card records, phone calls, medical records, and numerous other sources including, without any requirement for a search warrant. This information would then be analyzed to look for suspicious activities, connections between individuals, and “threats”.

या IOA चा एक प्रकल्प आहे, त्याचे नाव ‘Scalable Social Network Analysis project’. याचे उद्दिष्ट – A project involving the development of techniques based on Social Network Analysis for “the key characteristics of terrorist groups and discriminating these groups from other types of societal groups.

 

Advertisements

5 thoughts on “फेसबूक – सत्तांतराचे नवीन माध्यम?

 1. अतूल पाटणकर June 28, 2011 / 8:18 pm

  मी या लेखात म्हटले होते, की पोलीसही फेसबुकच्या माध्यमातून माहिती गोळा करू शकतील. आज, पोलीस असे लक्ष ठेवत असल्याची बातमी आली आहे. http://ibnlokmat.tv/showstory.php?id=180572

  शिवाय फेसबुक आणि क्रांती बद्दल एक छोटे स्फुट वाचा: http://72.78.249.107/esakal/20110628/5115249848923031333.htm

 2. Prakash Bhide March 9, 2011 / 5:02 pm

  लेखात दिलेल्या इ-मेलच्या वापरातील “उघडेपणा” बाबत आपल्यापैकी बरेच जण अनभिज्ञ आहेत. डॅन ब्राऊनच्या “डिजिटल फोर्ट्रेस” या फिक्शनमधे वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही कितीही कपडे घाला, तुमचे परिपूर्ण दर्शन योग्य तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्यांना घडू शकते. मग त्यांचा हेतू अयोग्य असला तरीही. पासवर्ड, एन्क्रिप्शन वगैरे सर्व क्रॅक करता येते. आणि ही माहिती फिक्शनल नाही.
  मात्र तरीही कोणत्याही चळवळीला समाजातून जे व्यापक समर्थन आवश्यक असते – जे ख-या चळवळ्यांचे नैतिक बळ असते – ते या नव्या तंत्राने मिळू शकते. रजिस्टर झालेले सगळे कसोटीच्या क्षणी रस्त्यावर येतील हा भाबडा आशावाद मात्र सावधपणे बाजूला ठेवला पाहिजे.

 3. Vinay Sahasrabuddhe March 7, 2011 / 11:05 am

  Very well written and analysed… Many facebookies (or facebookers) turn out to be Keyboard Warriors. While this certainly is not to suggest that their activism is of less importance; the point remains that like strength it also has its own limitations. Sending an e-mail is like fasting on Mondays in response to Lal Bahadur Shastriji’s appeal or going to a shakha everyday …! But then, both these activities demand a lot more than a click of a mouse. Hence, the more your vehicle for participation becomes easier, the greater are the chances of it being taken lightly. Hence, a word of caution before we jump to conclusion…

 4. Kanchan March 7, 2011 / 1:52 am

  “Social Networking chya madhyamane chalval purna hot nahi, tyasathi sarva tharatalya lokanchi manasik ani sharirik ‘involvement’ asayala havi” ani “Social networking var poorna avalamboon rahu naye”, he barobarch ahe. Pan, kothalyahi chalavalila vaicharik disha denya sathi sam-vaicharik lokanmadhe ‘communication’ vadhavane ani chalavalisathi laganari arthik madat jama karane, he aajkal ‘Social networking mule sope zale ahe. Chalavalitale sarva ‘social networking’ karat nasale tari je lok chavalila disha devu shakatat te lok matra ‘Social networking’ cha upyog karatat. Egypt madhe hech zale, ase mala vatate.

 5. मिलिंद March 6, 2011 / 10:56 pm

  अगदी योग्‍य विश्‍लेषण! न्‍यूयॉर्क टाइम्‍स मधे थॉमस फ्रीडमनने दोनअडीच वर्षांपूर्वी टीनेज पोरापोरींच्‍या ‘फेसबुक क्रूसेड्स’ वर असेच ताशेरे ओढले होते. मेल आणि मेसेजेस पाठवून परिवर्तन होत नाही, त्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरावेच लागते, असे फ्रीडमनचे म्‍हणणे होते…
  आणि ज्‍याचे जळते, तोच रस्‍त्‍यावर उतरतो – हेही खरे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s