हा नचिकेता कपूर आहे तरी कोण?

विकीलीक्सची सुनामी काल भारतीय संसदेवर कोसळली,आणि त्या भूकंपाच्या केंद्रबिंदूत एक नाव आढळले – नचिकेता कपूर. यांनी म्हणे नोटांनी भरलेली २ कपाटे अमेरिकेच्या माणसाला दाखवून सांगितलं, अणु करार नक्की होणार, खासदारांशी व्यवहाराची सगळी सोय झाली आहे!

कोण आहे हा नचिकेता? सतीश शर्मांशी यांचा काय संबंध? अमेरिकन दूतावासाचा याच्यावर एवढा विश्वास का? याच्या ‘तुम्ही टेन्शन घेवू नका हो, आपण सगळं बरोब्बर मॅनेज करू’ या प्रौढीला एवढ महत्व काय, की हे वाक्य, त्याच्या नावासकट, अमेरिकन दुतावासाने ‘वर’ कळवावं? काय आहे याचा कॉंग्रेसमधला इतिहास? त्यात असं काय लपलय, की ज्यामुळे पंतप्रधानसुद्धा ‘मी असे काही आदेश दिले नव्हते’ एवढंच म्हणतात – नचिकेता (किंवा कॉंग्रेस) असं काही करणं शक्यच नाही असा विश्वास ते या माणसाबद्दल का दाखवू शकत नाहीत?

उत्तरांचल मधले मूळ गाव सोडून आलेल्या नचीकेताच शिक्षण झालं उच्चभ्रू दिल्ली पब्लिक स्कूलमधून. लोक असं सांगतात, की दहावी नापास झाल्यावर त्यानी ‘जगाच्या प्रयोगशाळेत’ व्यावहारिक शिक्षण घ्यायला सुरवात केली. तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकलात, या प्रश्नाला ‘ते सगळं पुन्हा केव्हा तरी’ असं उत्तर मिळत. पण बोलणं फराटेदार, अमेरिकन उच्चाराच्या इंग्रजीतून, नाहीतर डौलदार हिंदीतून. दिल्लीतल्या राजिंदर नगर भागातल्या सर गंगाराम हॉस्पिटल मार्गावर यांचा प्रशस्त बंगला आहे – लॉनवर १००-२०० माणसांना पार्टी देता यावी एवढा मोठा. खास सरंजामी दिल्ली इश्टाईलचा.

मनिष तिवारी युवक कांग्रेसचे अध्यक्ष असताना यांना तिथे महासचिव पदावर काम करायची संधी मिळाली. नंतर युवक कॉंग्रेसच्या ‘विदेश’ विभागाचे काम त्यांच्याकडे आले. या भूमिकेत दिल्लीतल्या अनेक राजदूत कार्यालयांशी ओळख वाढवून, नचिकेताने आपले सामाजिक वर्तुळ अफाट विस्तारले. जगभरातल्या उगवत्या ताऱ्यांना अमेरिकेच्या प्रभावात आणण्यासाठी अमेरिकन सरकारचा एक विभाग आहे – American Council for Young Political Leaders. नचिकेता कपूर यांचे जणू भारतातले अनधिकृत प्रवक्ते बनले. या संस्थेच्या अनेक पार्ट्या नचिकेतच्या बंगल्यावर रंगायला लागल्या.

दरम्यान, नचिकेताचा मेव्हणा सोनिया गांधींच्या जावयाचा, रॉबर्ट वड्राचा स्वीय सहाय्यक बनला. नचिकेताचे कॉंग्रेस पक्षातले स्थान मोठे होत गेले. राहुल गांधींचा बंगला, कॅप्टन सतीश शर्मांचा बंगला, वगैरे ठिकाणी त्याची उठबस वाढायला लागली. २००४च्या निवडणुकांत डाव्या पक्षांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी नचीकेतावर आली. त्यासाठी त्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला २०,००० रुपयांची रोख देणगीही दिली. या यशस्वी कामगिरीनंतर त्याचा तोरा आणखीनच वाढत गेला. सतीश शर्मांच्या मुलाच्या लग्नाच्या पार्टीत कोण कोण आले याबद्दल जेव्हा वर्तमानपत्रांनी बातम्या दिल्या, तेव्हा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पाठोपाठ नाव आलं ते नचीकेता कपूरचं.

२००४ साली काँग्रेस सरकार निवडून आल्याबरोबर, तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे एन दीक्षित यांच्यासोबत ‘संशोधन अधिकारी’ म्हणून नचिकेता काम बघू लागला. त्यांच्या बरोबर अनेकदा विदेश दौऱ्यावरही गेला. त्याचे अमेरिकन दूतावसाशी संबंध या काळात अधिकच गहिरे होत गेले.

२००५ मध्ये, श्री. दीक्षित यांच्या निधनानंतर पर्यटन मंत्री रेणुका चौधरी यांच्या सोबत ‘विशेष कार्य अधिकारी’ (Officer on Special Duty) म्हणून याची नेमणूक झाली. २००७-८ मध्ये केव्हातरी अमेरिकन दुतावासाने रेणुका चौधरींच्या निदर्शनाला आणले, की कपूर साहेब घाऊक प्रमाणात, अनधिकृतपणे, अमेरिकन  विसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचं काळात रेणुका चौधरींच्या कार्यालयातल्या काही कागदपत्रांमध्ये अनधिकृत बदल केल्याचा, हॅकिंगचा  गुन्हाही नचीकेताविरुद्ध संसद मार्ग पोलीस ठाण्यात नोंदवला गेला, आणि कपूर साहेब पुन्हा नोकरी शोधू लागले. गुप्तहेर खात्याच्या काही खबरीमुळे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूकाविषयक समितीने तेव्हा कार्मिक विभागातर्फे (Dept of Personnel and Training) एक परिपत्रक काढून कुठल्याही संवेदनशील जागेसाठी नचीकेताचा विचार करू नये, असे सर्व कार्यालयांना कळवले.

या अशा भक्कम शिफारशीमुळेच बहुतेक, २००८ मध्ये त्यांना त्यांच्या गुणाची योग्य कदर करणाऱ्या माणसासोबत काम करायची संधी मिळाली. सुरेश कलमाडींनी, मंत्री गटाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून, त्यांची नेमणूक केली ती कॉमनवेल्थ खेळांच्या संयोजन समितीच्या राजशिष्टाचार विभागाच्या सहसंचालक पदावर. (Deputy Director, Protocol)शिवाय परदेशी पत्रकारांशी संपर्क ठेवण्याचीही जबाबदारी नचीकेतावरच होती. या नात्याने त्याने दिल्लीतल्या विदेशी पत्रकार संघाचे  सदस्यत्वही पटकावले. पण तेव्हढ्यात ‘अखिल भारतीय मुस्लीम एकता फोरम’ नावाच्या संघटनेच्या महम्मद युनूस सिद्दिकी यांनी माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करून त्यांच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल माहिती मागवली. त्यामुळे नचिकेतला या पदावरूनही दूर व्हावं लागलं.

२००८मध्येच अमेरिकेतली अध्यक्षीय निवडणूक झाली. American Council for Young Political Leadersच्या सौजन्याने नचिकेता त्यासाठी ‘विशेष निरीक्षक’  या भूमिकेत अमेरिकेत जावून आला. त्याच्या त्या काळातल्या लेखांचे बरेच कौतुकही ACYPL ने केले होते.

आजच्या राजकारणात चलती आहे ती अशा नचीकेतांची. प्रत्येक पक्षाला यांची गरज वाटते, आणि राजकारण जेवढं अस्थिर आणि भ्रष्ट, तेवढे हे जोमानी वाढतात. आज कॉंग्रेसचे नेते याला ओळखही देणार नाहीत, पण पुढच्या वर्षी हा विषय थंड पडला, की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

आपल्याला आपल्या देशाची चिंता वाटते, सरकारी कारभार सुधारावा असं वाटतं. त्यासाठी आपल्याला हे नचिकेता खड्यासारखे फेकून द्यावे लागतील. जे लोकप्रतिनिधी किंवा सरकारी नोकर आहेत, त्यांना काही तरी उत्तरदायित्व आहे. पण या नचीकेतासारख्या सत्तेच्या दलालांना कुठेच बंधन नाही. आणि यांचा मज वाढवतो तो ‘साहेबांपर्यंत’ थेट जायला घाबरणारे आपण. आपल्याला नगरसेवकाकडून मार्कशीट्सवर सही हवी असली, तरी आपण कुठल्या तरी ‘खास’ माणसाला विनंती करतो. आणि तो आपल्याला सांगतो, ‘काळजी करू नको. साहेब माझ्या शब्दाबाहेर नाहीत’. आपणही त्याची फी लगेच आनंदानी देवून टाकतो. मग त्याचा आत्मविश्वास वाढतो – खासदार खरेदी करण्याएवढा.

त्यामुळे या विकीलीक्स्चे काहीही होवो –  आपण आपल्या भोवतालचे नचिकेता ओळखायला शिकूया. नियमात बसणारीच कामे करुया, आणि त्यासाठी मध्यस्थ टाळूया. लोकांनी मनावर घेतल, तरच लोकशाही टिकू शकते. नाहीतर वरून कीर्तन आतून तमाशा – तो बघणे आणि फेटे उडवणे एवढेच आपल्या हाती राहील.

Advertisements

11 thoughts on “हा नचिकेता कपूर आहे तरी कोण?

 1. Milind Arolkar March 21, 2011 / 1:36 pm

  Informative and timely information.
  Politics in Delhi is full with those Nachiketas!

 2. Prakash Bhide March 21, 2011 / 11:36 am

  माहिती दिल्याबद्दलच्या भावना सगळ्यांनी पोहोचवल्या आहेतच. पण समारोपात जे आवाहन आहे ते खूपच महत्वाचे आहे. After all everybody has a role to perform, however small it may be. नुसते फेटे उडवून परिस्थिती बदलणार नाही.

 3. Anand Kulkarni March 19, 2011 / 11:06 pm

  Hi
  Thanks for the informative article..! Keep it up..!

 4. madhav bhandari March 19, 2011 / 7:10 pm

  फारच चांगला आणि माहितीपूर्ण लेख आहे…. शरदमणी ची खास मल्लिनाथी तडका द्यायला पुरेशी आहे.

 5. suryakant March 19, 2011 / 6:08 pm

  thank u. bhrashtari nachiket cha itihas ( history ) sangitlya babat…….apan sarvajan milun asha anek nachiket la dhada shikvuyat.

 6. VINAY SAHASRABUDDHE March 19, 2011 / 2:47 pm

  Very timely and informative too. I liked Sharadmani’s comment too. As usual, it has an unmistakable Sharadmani Touch!

  • sampada March 19, 2011 / 4:48 pm

   It is reminder to everybody to point out Nachiketa” we all know these N’ in our surrounding!
   ,it is very informative”- thanks

 7. Ashlesha March 19, 2011 / 12:48 pm

  क्या बात है अतूल………………thanks ……………..खुप माहिती समजली … जसे ..दहावी नापास नचिकेता कपूर…………..युवक कॉंग्रेसच्या ‘विदेश’ विभागाचे काम त्यांच्याकडे आले. ……………‘विशेष निरीक्षक’ या भूमिकेत अमेरिकेत जावून आला. नचिकेताचा मेव्हणा सोनिया गांधींच्या जावयाचा, रॉबर्ट वड्राचा स्वीय सहाय्यक बनला. ..वगैरे ………..

  आपण आपल्या भोवतालचे नचिकेता ओळखायला शिकूया. नियमात बसणारीच कामे करुया, आणि त्यासाठी मध्यस्थ टाळूया. लोकांनी मनावर घेतल, तरच लोकशाही टिकू शकते…………..शेवट appealing …………

 8. sharadmani March 19, 2011 / 1:16 am

  कठोपनिषदाचा नायक होता एक नचिकेता. तो सत्यासाठी उभा ठाकला व त्या प्रयत्नात मरण पत्करले. शेवटी यमाशी वाद जिंकला आणि अमर झाला. हा पठ्ठा सत्यासाठी नाही तर सत्तेसाठी उभा ठाकलेला दिसतो. हाही एका अर्थाने अमर आहेच. जो पर्यंत ‘दिल्ली’ आहे तो पर्यंत असे तिकडमबाज आणि फिक्सर नचिकेत अमरच राहणार.

 9. Kanchan March 18, 2011 / 8:33 pm

  Mihitisathi dhanyavaad… Shevatacha salla agadi manat ghar karoon gela.

 10. मिलिंद March 18, 2011 / 8:22 pm

  नचिकेताविषयीची माहिती तर डोळे उघडणारी आहेच, पण शेवट फार मोलाचा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s