वाचाळ प्रकाश बाळ आणि त्यांचा उतरता काळ

दैनिक लोकमतच्या १९ मार्चच्या अंकात प्रकाश बाळांनी लेख लिहून सर्व हिंदुत्ववाद्यांना फॅसिस्ट ठरवले आहे, आणि हे लोकं पानसर्‍यांना धमकावत असताना यांचे मुख्यमंत्री भोसला मिलिटरी स्कूल मध्ये डॉ. मुंजांचे चरित्र प्रसिद्ध करतांना चक्क मुंज्यांबद्दल आदर व्यक्त करतात, त्यामुळे आता पानसर्‍यांच्या हत्येचा शोध कसा काय लागणार, असा काही दावा केला आहे. त्याचे मी लिहिलेले उत्तर. लोकमतच्या संपादकांनी ‘श्री. अतूल पाटणकर यांनीही प्रतिक्रिया पाठवली आहे’ एवढी दाखल घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानून हा लेख देतो आहे.

मूळ लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रकाश बाळांच्या लेखात ३ प्रकारची विधाने आढळतात – खोटी, साफ खोटी, आणि धडधडीत खोटी. पण त्यांच्या स्वयंघोषित विचारवंतपणाचा आणि स्वयंसिद्ध विद्वत्तेचा धाक इतका जबरदस्त आहे, की भले भले ‘काहीतरी आपलंच चुकत असेल. निखील वागळे सुद्धा ज्यांच्याशी बरा वागतो, एवढा मोठा माणूस उगाचच अस लिहिणार नाही’ असा विचार करून गप्प बसतो. या लेखाचा मुख्य (डगमगता असला तरी) आधार आहे इकोनॉमिक अॅन्ड पोलिटीकल वीकली नामक फिरंगी नियतकालिकात १५ वर्षांपूर्वी आलेला Marzia Casolari बाईंचा लेख. प्रकाश बाळ लेखिकेच्या नावाचा उल्लेख, का ते माहिती नाही, पण वॅस्सोलारी असा करतात.

काय आहे या लेखात? शीर्षकात पाकिस्तानचा उल्लेख आहे. पण पाकिस्तानच्या मागणीच्या ठरावात कुठले आदर्श मांडले होते, तिथले राज्यकर्ते कसे त्या आदर्शांच्या दिशेने त्यांच्या देशाला वेगात घेवून चालले आहेत, आणि आता २०१५ मध्ये तिथे काय परिस्थिती आहे, याचा काहीच उल्लेख नाही. जर अशी काही माहिती द्यायचीच नव्हती, तर बिचाऱ्याला या लेखाच्या भानगडीत कशाला ओढलंय?

आता भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या कॉंग्रेसने केलेल्या ठरावाबद्दल – आम्हाला शाळेत शिकवायचे, की ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री बियास नदी काठी लाहोरच्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. पण बाळ म्हणतात की हा ठराव १९३१मध्ये, मार्च मध्ये, कराचीला झाला! त्यामुळे प्रकाश बाळांच्या ‘आत्ताच कां’ यात दिलेली कारणे फुसकी आहेत, त्यांची खरी करणे कदाचित वेगळी असतील, हे स्पष्ट होते. आता त्यांना पाकिस्तानच्या ठरावाचा हीरक महोत्सव हिंदुत्ववाद्यांवर चिखल उडवून साजरा करायचा असेल, तर गोष्ट वेगळी.

डॉ, मुंजे ‘वसाहतीचे स्वातंत्र्य’ स्वीकारायला तयार होते. असा उल्लेख करताना बाळ हे विसरले की डिसेंबर १९२८ काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात नेमका असाच ठराव महात्मा गांधींनी मांडला होता, आणि कॉंग्रेसने पास केला होता. आणि या ठरावाला विरोध करणाऱ्या (सुभाषबाबू, आणि अन्य नेत्यांना) महात्मा गांधींनी तीव्र समज दिली होती! शिवाय डॉ. मुंजे काही तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हते. त्यामुळे कधी वसाहतीच स्वातंत्र्य मागायचं, कधी पूर्ण स्वातंत्र्य मागायचं, याचा त्यांचा विचार कॉंग्रेसपेक्षा वेगळा असला, तर त्यामुळे ते ‘जन्मभर इंग्रजांची गुलामी करायला तयार होते’ असा अनर्थ सूचित का करायचा? आणि डॉ. मुंजे काही मुसोलीनिशी सगळ खर बोलायला बांधील नव्हते. ते धोरण म्हणून त्यांच्या जे मनात असेल त्यापेक्षा वेगळ काही तरी बोलत असतील, हे बाळांसारख्या कसलेल्या राजकारण तज्ञाला काय लक्षात येत नसेल? डॉ. मुंजे मुसोलिनीला एकदा भेटले, आणि त्याच्या विचारांनी (म्हणे) प्रभावित झाले असा आरोप करताना बाळ विसरतात, की महात्मा गांधीजीही मुसोलिनी ने दिलेल्या आमंत्रणाचा मन ठेवून इटलीत गेले, त्याच्या काळ्या शर्टधारी तरुणांनी गांधीजींना लष्करी मानवंदना दिली, आणि दोघांनीही एकमेकांची भरपूर स्तुती केली. मग गांधीजीही मुसोलिनीच्या प्रभावाखाली होते अस म्हणायचं का? की दोघांनाही शत्रूचा शत्रू निदान ओळखीचा असावा अस वाटत होत? मुसोलिनीची जाहीर स्तुती करणाऱ्यांमध्ये चर्चीलसारख्या राजकारण्यांपासून जॉर्ज बर्नार्ड शॅा सारख्या साहित्यीकापर्यंत लोक होते. इतिहासाच्या अन्तःप्रवाहात खोलवर डुबक्या मारणाऱ्या बाळांना काय हे माहिती नाही, की दोन महायुद्धान्मधल्या काळात अनेक विचारवंताना फॅसिझम, नाझीझम, कम्युनिझम वगैरे आत्यंतिक विचारसरणीचे आकर्षण होते, आणि त्यांचा भेसूर चेहरा बऱ्याच वर्षांनी जगासमोर आला? मुंजे यांना इटलीतल्या स्थानिक ब्रिटीश प्रतीनिधीने ओळखपत्र दिले होते, एवढ्याच पुराव्यावर मार्झीयाबाई निष्कर्ष काढतात, की मुन्जेंची हि भेट ब्रिटीश सरकारनेच घडवून आणली! प्रकाश बाळ तर काय, इटालियन बाई जे म्हणेल, ते त्यांना सर्वस्वी मान्य असतंच.

बाळांचा मुख्य मुद्दा असा, की मुंजे मुसोलीनिकडून हुकूमशाहीचे प्रेम, हिंसक वृत्ती, तरुणांची संघटना बांधण्याची पद्धत, वगैरे शिकून आले, आणि इथे आल्यावर त्यांनी त्याच आदर्शांच्या शोधात, आणि त्याच पद्धतीने रा स्व संघ वाढवला. शिवाय भोसला मिलिटरी स्कूल स्थापन केले. पण त्यांनी मार्झियाबाईच्या एखाद्या लेखावर अवलंबून न रहाता डॉ. मुंजेंची रोजनिशी वाचली असती, तर त्यांच्या लक्षात आले असते, की मुंज्यांनी मिलिटरी स्कूल स्थापन करण्याचे ठरवले होतेच. भारतातल्या काही जाती ‘लढवय्या’ आणि इतर नाही, असा जातीभेद मोडून काढून सर्व भारतीय तरुणांना लष्करी शिक्षण मिळावे, भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारायला प्रशिक्षित अधिकारी वर्ग उपलब्ध असावा, अशी त्यांची विचारसरणी होती. तत्कालीन भारताच्या लोकसभेत ते वारंवार संरक्षण विषयावर अभ्यासपूर्ण भाषणे कारित असतं. आणि ते केंद्र सरकारच्या संरक्षण विषयक समितीचेही सदस्य होते. भारतात अधिकारी प्रशिक्षण केंद्र झाले पाहिजे, या त्यांच्या मागणीला ब्रिटीशांकडून (नाईलाजाने का होईना) सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. या विचारांनी त्याच युरोप दौऱ्यात त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, वगैरे देशांच्याही लष्करी शाळाना भेटी दिल्या होत्या, आणि त्या प्रत्येक ठिकाणच्या चांगल्या गोष्टींची चर्चा अशाच प्रकारे रोजनिशीत केली आहे. या त्यांच्या युरोप दौऱ्यानंतर थोड्याच काळात डेहराडूनला इंडियन मिलिटरी ऍकॅडमीची स्थापना १ ऑक्टोबर १९३२ला झाली. आता हे सगळ ब्रिटिशांनी मुसोलीनिपासून प्रेरणा घेवून केलं, असा निष्कर्ष काढायला प्रकाश बाळ मोकळे आहेत, पण त्यांच्याकडे ही मूळ दैनंदिनी वाचायला वेळच नाही. आणि मार्झिया बाईच्या लेखात जर हे सगळं नसेल, तर बिचारे बाळ तरी काय करणार?

जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरु झाले, तेव्हा कॉंग्रेसने असहकार पुकारला होता. साम्यवाद्यांची आधीची ‘या युद्धाचा कष्टकरी जनतेशी संबंध नसल्याची’ भूमिका हिटलरनी रशियावर हल्ला केल्यावर रातोरात बदलली. आणि हिंदुत्ववादी या निमित्त्याने लष्करी प्रशिक्षण आणि युद्धाचा अनुभव पदरात पाडून घ्यावा, अशी भूमिका मांडत होते. यातली एखादी भूमिका मान्य असणे-नसणे वेगळे. पण आपल्याला न पटणारी भूमिका घेणाऱ्याला राष्ट्रद्रोही ठरवणे, हा खास समाजवाद्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचा मासला आहे, यात काही शंका नाही. माझे विचार ज्याला मान्य आहेत, तो लोकशाहीवादी, ज्याला मान्य नाहीत तो फॅसिस्ट.

इथपर्यंत मार्झीयाबाईच्या लेखाचा तरी आधार धरून लिहिणाऱ्या बाळांचे लिखाण नंतर पूर्ण निराधार बनत जाते. ते म्हणतात, हिंदुत्ववादी पानसरेना धमकी देत होते. त्यांना जर इतकी सखोल माहिती असेल, तर ते पोलिसांना नावं का सांगत नाहीत? डॉ. मुंजे, सावरकर, वगैरे केवळ वेगळ्या विचारसरणीचे लोक वाटतात, की थेट अतिरेकी? शेषाद्री चारींनी ‘उघडपणे’ मान्य केलं म्हणजे काय? त्यात काही लपवण्या सारखा, लाजिरवाणा प्रकार आहे का? करकरेनी कुठल्या प्रकरणात भोसला मिलिटरी स्कूलची संस्थेची चौकशी केली? तिथले कुणी पदाधिकारी किंवा कर्मचारी वगैरे ‘हिंदुत्ववादी दहशतवादी’ आहेत का? त्याची काही ठाम माहिती जर प्रकाश बाळांकडे असेल, तर त्यांनी ती पोलिसांना दिली असेलच. की हा सगळा नुसताच आरोपांचा धुरळा उडवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न आहे?

प्रकाश बाळांनी खरच का लिहिला असेल हा लेख? कुठल्या घटनेने ते अस्वस्थ झालेत? वरवर वेगळ्या वाटणाऱ्या कुठल्या घटनांमध्ये त्यांना एक समान सूत्र आढळलं आहे? इतिहासातल्या एका ठराविक कालखंडाकडे लक्ष वेधून त्यांना विद्यमान राजकारणातला कुठला हिशोब चुकता करायचा असेल? त्यांच्या लेखाकडे नीट नजर टाकली तर कदाचित आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

सगळ्या लेखाचा सारांश करायचा, तर हिंदुत्ववाद हे फॅसिझमचे भारतीय रूप आहे, डॉ. मुंजे आणि डॉ. हेडगेवार यांनी भोसला मिलिटरी स्कूल व रा स्व संघ या संघटनांच्या माध्यामातून हा अजेंडा पुढे रेटला, भोसला मिलिटरी स्कूलची ‘हिंदुत्ववादी दहशतवादी’ म्हणून एटीएसच्या करकरेंनी चौकशी केली होती, संघाचे मोदी हाच अजेंडा राबवत आहेत, हिंदुत्वावाद्यांनीच पानसरेना मारलं (असेल), आणि त्याचं विचारातून आलेले फडणवीस तर चक्क भोसला शाळेत जावून मुंजे विचार मांडतात, त्यामुळे या पानसरेंच्या खुन्याचा शोध लावण्याची हिम्मत पोलीस दाखवू शकणार नाहीत ……..असा करता येईल. थेट आरोप नं करता फक्त बोटं दाखवायची, कुठल्याही पुराव्याविना निष्कर्ष काढायचे, दुसऱ्याच्या लिखाणातून संदर्भ सोडून वाक्ये वापरायची, आपल्या सर्व विरोधकांना देशद्रोही ठरवायचं, वगैरे खास ‘विचारवंत’ तंत्रांचा पुरेपूर वापर करून बाल आपले म्हणणे मांडतात. पण हे बहुतेक सगळं प्रकरण इतकं हास्यास्पद आणि तर्कदुष्ट आहे, की त्यातून वाचकाला बाळ हे विचारवंत असल्याची पुन्हा एकदा खात्री पटते, पण बाकी काहीच भर त्याच्या ज्ञानात किंवा विचारात पडत नाही.

मग हा लेख का? आणी आत्ताच का? कारण हिंदुत्ववाद अभिमानाने मिरवणाऱ्या लोकांना मतदारांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिलं, ही गोष्ट बाळ आणि त्यांच्या सहप्रवाशांना अजूनही पचत नाही. त्यामुळे पोटातली मळमळ काढून टाकावी लागते. आणि एकदा सगळा कडवटपणा बाहेर पडला, की थोडा वेळ तरी बरं वाटतं. मला वाटतं त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही!

Advertisements

3 thoughts on “वाचाळ प्रकाश बाळ आणि त्यांचा उतरता काळ

 1. Rajeev Joshi April 2, 2015 / 7:54 pm

  prakash baal he swaghoshit thor vicharvant aahet. tyamule te yogya aani atul patankar chukiche aahet.

 2. Milind Thatte March 27, 2015 / 7:11 pm

  तू लोकमतला पाठवताना खाली भोसला कोषाध्यक्ष असं लिहीलं होतंस का?

  – मिलिंद Milind
  Organizer, Vayam (वयम् – आपल्या विकासाची आपली चळवळ)
  Jawhar, Dist. Palghar | Phones: +91.8879.330.774 and +91.9421.564.330

 3. KESHAV TIRODKAR March 27, 2015 / 10:43 am

  SUNDAR LEKH PRAKASH BAL HA BALBUDHICHA AAHE !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s